आधारची फोटोकॉपी आता लागणार नाही, क्यूआर कोड-फेस आयडीने होणार ओळख; नवे अ‍ॅप लॉन्च

 



ओळखपत्र म्हणून प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं किंवा त्याची एक झेरॉक्स कॉपी जमा करावी लागते. काहीवेळा झेरॉक्स काढताना आधार कार्ड नंबर सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची भीती देखील असते. आता आधार कार्ड अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधार कार्डची कॉपी जमा करण्याची आवश्यकता नाही. क्यूआर कोड आणि फेस आयडीच्या मदतीनं तुम्ही तुमची ओळख पटवू शकता. यासाठी नवीन अॅप लाँच करण्यात आलं आहे.


आता तुम्हाला हॉटेल, विमानतळ किंवा इतर ठिकाणी ओळख पटवण्यासाठी आधार कार्डाची झेरॉक्स कॉपी (फोटोकॉपी) देण्याची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने एक नवीन आधार अ‍ॅप आणले आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त क्यूआर (QR) कोड स्कॅन करून किंवा तुमचा चेहरा दाखवून (फेस आयडी) तुमची ओळख पटवू शकाल. केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या नवीन अ‍ॅपमुळे आधार कार्डाची फोटोकॉपी देण्याची आणि ती जपून ठेवण्याची गरज संपणार आहे


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन सुविधेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "आधार पडताळणी आता अधिक सोपी, वेगवान आणि सुरक्षित होईल." त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "या अ‍ॅपमुळे फिजिकल कार्ड किंवा फोटोकॉपीची गरज नाही. फक्त एका क्लिकवर आवश्यक माहिती शेअर करा आणि तुमच्या गोपनीयतेवर पूर्ण नियंत्रण ठेवा."


नवीन अ‍ॅपची वैशिष्ट्ये:


फेस आयडी: चेहरा दाखवून ओळख पटवण्याची सोय यात आहे, जी खूप सोपी आणि सुरक्षित आहे.


क्यूआर कोड स्कॅनिंग: जसे आपण UPI पेमेंटसाठी कोड स्कॅन करतो, तसेच आधार पडताळणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करता येईल.


सुरक्षितता: हे अ‍ॅप सध्या बीटा टेस्टिंगमध्ये (अंतिम चाचणी सुरू) असून, लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्यावर आणि गोपनीयतेवर विशेष लक्ष दिले आहे.


सरकारच्या या नवीन अ‍ॅपमुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहील आणि दैनंदिन कामांमध्ये आधार वापरण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि आधुनिक होईल, असे मानले जात आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने